पुणे – भावाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी सराईताकडून तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भावच्या खूनाचा बदला घेण्यासाठी सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने रामटेकडी परिसरातील वस्तीतील चार ते पाच घरांमध्ये शिरून हत्यारांनी घरातील साहित्यांची तोडफोड केली. वस्तीतील कुटूंबांना शिवीगाळ करत धमकी दिली. ही घटना हडपसर रामटेकडी येथे विश्वरत्न मित्र मंडळा समोर घडली. याप्रकरणी सराईत गुन्हेगार लकिसिंग गब्बरसिंग टाक, तौफिक शेख व दोन अल्पवयीन मुलांवर वानवडी पोलिसांनी खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. राजू थोरात (44, रा.रामटेकडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

राजू थोरात घरात असताना आरोपी लकिसिंग साथीदारांसह त्यांच्या घरात शिरला. त्याने राजूला ‘तुम्हारा लडका किधर है, उसे जिंदा नही छोडूंगा मेरे भाईके मर्डरमे उसका भी हात है’ असे म्हणत कोयत्याने राजू यांच्यावर वार केला. मात्र त्यांनी तो चुकवल्याने कोयता फ्रिजवर लागला. तैफिकने रॉडने घरातील टीव्ही, पाण्याचा माठ, कपाटाची काच फोडली. यानंतर त्यांच्या घराशेजारी रहाणाऱ्याच्या घरात आरोपी शिरले. त्यांनाही आरोपींनी ‘तुम्हारे बेटे किधर हे, उन सबने मिलकर मेरे भाई को मारा है’ असे म्हणत त्यांना शिवीगाळ करत दहशत माजवून घरातील वस्तुंचे नुकसान केले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे करत आहेत.

आरोपीच्या भावाचा एक वर्षांपुर्वी झाला खून

सराईत आरोपी लकीसिंग याच्या सख्ख्या भावाचा एक वर्षापूर्वी खून झाला होता. संबंधित खूनातील आरोपींनी वस्तीवरील मुलांनी मदत केली असल्याचा संशय त्याला होता. त्यामुळे रागातून त्याने सोमवारी सायंकाळी साथीदारांसह वस्तीत येऊन तोडफोड करत दहशत माजवली.