गुटख्याच्या पुडीवरून राडा, मारहाणीत सराईताचा मृत्यू; निवृत्त पोलिसावर खूनाचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुटख्याची पुडी न दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये झालेल्या हाणामारीत सराईताचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी रात्री सातच्या सुमारास खडकीतील बाराथे वस्तीवर घडली. या प्रकरणी पोलीस दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यावर खूनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

अनंत तुळशीराम ओव्हाळ (वय – 61, रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मनीष काळुराम भोसले (वय – 22, रा. बाराथे वस्ती, खडकी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी हनुमंत भोसले (वय – 58) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत ओव्हाळ पोलीस दलातून निवृत्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी ते बाराथे वस्तीवर दुचाकीवर चालले होते. त्यावेळी सराईत मनीष भोसले याने त्यांना अडवून गुटख्याची पुडी मागितली. त्यावेळी अनंत यांनी त्याला पुडी नसल्याचे सांगितल्यामुळे मनीषने त्यांना मारहाण करण्यात सुरूवात केली. त्यामुळे त्यांनी दुचाकीवरुन उतरून मनीषसोबत झटापट केली. त्यानंतर मनीष खाली पडल्यानंतर अनंत यांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे मनीषचा मृत्यू झाला.

या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी यांनी सांगितले.