
हिंदुस्थानात उपचारासाठी आलेल्या सिएरा लियोन देशाच्या महिलेला परत जाण्यासाठीचा परमीट (एक्झिट परमीट) काढून देण्यासाठी पैसे देऊन बनावट परमीट तयार करून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नविंदर सिंग (रा. नवी दिल्ली) आणि एगनेस कोन्सह (रा. नवी दिल्ली, मूळ- सिएरा लियोन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परकीय नोंदणी विभागाचे पोलिस कर्मचारी सचिन सहाणे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिएरा लियोन देशातील एक महिला मार्च 2020 मध्ये हडपसर परिसरातील एका रूग्णालयात उपचारासाठी आली होती. त्यांना वेळोवेळी तपासणी करून डॉक्टरला भेटणे आवश्यक होते.
ऑगस्ट 2020 पर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या देशात परत जायचे होते. त्यासाठी एक्झिट परमीट आवश्यक होते. त्यासाठी महिलेने दिल्लीतील मैत्रिणीसोब संपर्क साधला. तिने कागदपत्रे मागवून नवींदर सिंग नावाच्या व्यक्तीला पाठविली. त्यानंतर सिंग याने त्याच्या मेलआयडीवरून मुंबई येथील परकीय नोंदणी विभागात अर्ज केला होता. त्यासाठी महिलेकडून 18 हजार रूपये घेतले. पण, महिलेला एक्झिट परमीट न मिळाल्यामुळे तिने पुण्यातील परकीय नोंदणी विभागाकडे जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांना एक्झिट परमीटसाठी कोणतेही पैसे आकारले जात नसल्याचे समजले.
त्यानंतर महिलेने सिंगला विचारणा केल्यानंतर त्याने पैसे भरावे लागतात, असे सांगितले. त्यानंतर त्याने बनावट परमीट तयार करून महिलेला पाठविले. परमीट बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर पुणे पोलिसांच्या परकीय नोंदणी विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत.





























































