पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुडगूस, महिलांसह पादचारी लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी धुडगूस घातला असून महिलांसह पादचार्‍यांना लक्ष्य केले जात आहे. विशेषतः दागदागिने, मोबाइल फोन हिसकावून नेत चोरटे पसार होत आहे. मात्र, दुचाकीस्वार चोरट्यांच्या हैदोसाला स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून आडकाठीसाठी कोणता प्रयत्न केला जात आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

रस्त्याने पायी चाललेल्या महिलांचा पाठलाग करून निमर्नुष्य ठिकाणी त्यांच्या गळ्यातील दागदागिने हिसकावून नेण्याचे प्रकार सर्रासपणे वाढीस लागले आहे. विशेषतः कमी वर्दळ असलेल्या ठिकाणांहून दुचाकीस्वार चोरटे महिलांसह पादचार्‍यांना लक्ष्य करीत आहेत. रस्त्याने एकट्या पायी चाललेल्या महिलेला अडवून तिच्या गळयातील दागदागिने किंवा मोबाइल बळजबरीने हिसकावून नेला जात आहे. अशीच एक घटना कात्रज परिसरात घडली असून महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कामावरून सुटल्यानंतर रस्त्याने पायी जात असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेला अडविले. त्यांच्या गळ्यातील 25 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ तपास करीत आहेत.

कामावरून सुटल्यानंतर पायी जाणार्‍या तरूणाला अडवून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल हिसकावून नेला. ही घटना 27 जानेवारीला रात्री पावणेबाराच्या सुमारास विमाननगरमधील एअरपोर्टकडे जाणार्‍या रस्त्यावर घडली. याप्रकरणी ओम पवार वय 32 यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ओम हे 27 जानेवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याला अडवून मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी विमानतळ पोलिस तपास करीत आहेत. शहरात विविध भागात महिलांसह पादचार्‍यांना अडवून लुटमारीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.