
फसवणूक आणि जमीन बळकाविण्याच्या कटात सहभागी असल्याच्या कारणावरून मोक्कातील फरार आरोपी रविंद्र बऱ्हाटे याच्या पत्नीसह दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. संगीता रविंद्र बऱ्हाटे (वय 55 ) आणि पितांबर गुलाब धिवार अशी अटक केलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली आहे.
शहरातील विविध नागरिकांकडे खंडणी मागणे, फसवणूक आणि जमिन बळकाविण्याच्या 12 गुन्हयांमध्ये बऱ्हाटे फरार आहे. त्याच्यासह तथाकथीत पत्रकार देवेद्र जैनही फरार आहे. त्यापैकी तीन गुन्ह्यामध्ये बऱ्हाटेविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या टोळमध्ये सांगलीचे संजय भोकरे, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांचाही समावेश आहे. मागील वर्षभरापासून बऱ्हाटे पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याने फेसबुकवर दोन वेळा प्रसारित करुन पोलिसांवर आरोपी केले होते. संंबंधित व्हिडीओ व्हायरल करण्यास मदत करणाNया पितांबरलाही पोलिसांनी अटक केली आहे. बऱ्हाटेने केलेल्या गुन्हयांमध्ये त्याच्या कुटूंबातील कोणाचा सहभाग आहे का? याची चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासात पत्नीचाही कटामध्ये सहभाग असल्याचे प्राथमिकदर्शी दिसत होते. त्यामुळे पुणे पोलिसांनी बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास संगीता बऱ्हाटेला ताब्यात घेउन अटक केले.
व्हिडीओ बनविण्यात बऱ्हाटेला मदत केल्याप्रकरणी अटक
गुन्ह्यातील आरोपी सचिन गुलाब धिवार याचा भाऊ पितांबराला पोलिसांनी अटक केली आहे. बऱ्हाटे फरार झाल्यापासून पितांबर त्याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. बऱ्हाटेने व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारीत केले होते. सर्व व्हिडीओ व ऑडीओ तयार करून प्रसारीत करण्याच्या कामात पितांबर याने बऱ्हाटेला मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यानुसार त्याला अटक केली आहे.



























































