पुणे – लुटमारीसाठी दुकानदारावर गोळीबार, एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

लुटमारीसाठी किराणा दुकानदारावर गोळीबार करणाऱ्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबार करणारा मुख्यसूत्रधार व त्याचे साथीदार पसार आहेत. ही घटना 14 फेब्रुवारीला दत्तनगरमध्ये घडली होती.

अशोक गोविंदराव गवई (वय 55, रा. वारजे माळवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विशाल प्रल्हाद पंजाबी (वय 36) असे गोळीबारात जखमी झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रामधन विश्वकर्मा, राजासिंग उर्फ राजकुमार आणि सुरजकुमार (रा. कात्रज, मूळ. उत्तरप्रदेश) हे तिघे फरार आहेत.

विशाल पंजाबी यांचे दत्तनगर भागात शिवांजली चौकात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. 14 फेब्रुवारीला रात्री साडेनउच्या सुमारास ते दुकानाबाहेर थांबले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हे शाखा आणि भारती विद्यापीठ पोलीस आरोपींचा कसून शोध घेत होते. त्यावेळी आरोपी अशोक गवई आंबेगाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. लूटमार करण्याच्या हेतूने त्याने गोळीबार केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, प्रणव संकपाळ, संतोष अनुसे, शिवदत्ता गायकवाड यांच्या पथकाने केली.