
नागरिकांनो, सावधान! तुम्ही मोटारीतून प्रवास करीत असल्यास, मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. अन्यथा तुमच्याविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. मोटारीतून दोन किंवा अधिकजण प्रवास करीत असल्यास मास्क वापरणे गरजेचे आहे. एकटाच चालक मोटारीत असल्यास, मास्कची आवश्यकता नसल्याची माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.
मोटारीतून प्रवास करीत असताना मास्क आवश्यक आहे काय? अशी विचारणा नागरिकांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. मोटारीतून एकापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्यांना मास्क वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे पुणेकरांनो, तुम्ही जर विनामास्क बिनदिक्कतपणे मोटारीतून फिरत असल्यास, तुमच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. शहरातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 2 सप्टेंबरपासून विनामास्क नागरिकांविरुद्ध 500 रुपयांची दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार प्रत्येक चौकात विनामास्क चालकांसह नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. मात्र, मोटारीत मास्कची आवश्यकता आहे का? अशी विचारणा सातत्याने अनेकांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोटारीतून एकट्या चालकाला विनामास्कचा ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. मात्र, दोनपेक्षा अधिकजणांनी प्रवास केल्यास सोशल डिस्टन्ससह मास्क लावून नियमांचे पालन करावे लागणार आहे.
“नागरिक विनामास्क फिरल्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान मास्कचा वापर करणे गरजेचा आहे. मोटारीत एकटा चालक असल्यास त्याला मास्क आवश्यक नाही. मात्र, दोन किंवा दोनपेक्षा जास्त नागरिक मोटारीतून प्रवास करीत असल्यास, मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून पोलिसांना सहकार्य करावे.“– डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त, पुणे.
























































