
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून कोयता, मिरची पावडर, स्क्रू ड्रायव्हर, दोन दुचाकी असा2 लाखांवर ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई 2 मे रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास फुरसुंगीत रेल्वे ट्रॅकजवळ करण्यात आली.
अभिजीत उर्फ भुऱ्या बाळू शिंदे (वय – 19, रा. गणेशनगर, हडपसर), आकाश रामहरी हजगुडे (वय – 21, रा. फुरसुंगी), निखील रत्नघोष वासनिक (वय – 28, रा. उरळी देवाची), आशिष मारूती धनके (वय – 22, रा. फुरसुंगी), प्रणव महादेव शिंदे (वय – 19, रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अमलदार प्रदीप सोनवणे यांनी तक्रार दिली आहे.
हडपसर पोलिस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना फुरसुंगी रेल्वे ट्रॅक परिसरात संशयास्पद टोळी पथकाला दिसून आली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेउन झडती घेतली असता, त्यांच्याकडे कोयता, मिरची पावडर, स्क्रू ड्रायव्हर, दोन दुचाकी असा 2 लाखांवर ऐवज जप्त करण्यात आला. परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांच्या पथकाने केली.


























































