
पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने प्रचारासाठी कंबर कसली आहे. चिंचवडचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी आज युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले पुण्यात आले आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभेत मिंधे गटावर सडकून टीका केली आहे. दरम्यान गद्दारांच्या विरोधात ’50 खोके एकदम ओके’ या घोषणा उपस्थितांमधून देण्यात येत होत्या. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ’50 खोके एकदम ओके’ हे वाक्य महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर कोणालाच झोंबणार नाही. कारण आम्ही शपथ घेऊन सांगू शकतो की आम्ही खोक्याला हात लावला नाही. मात्र ‘आम्ही खोक्याला हात लावला नाही’ असे 40 गद्दार आमदार आणि 13 खासदारांपैकी एकही जण बोलला नाही. गद्दारांना याचा जाब विचारल्यावर जाब विचारणाऱ्याच्या मागे पोलीस लावले जातात, लाठीचार्ज केला जातो, त्याच्या घरी धाड पडते आणि तपास यंत्रणा मागे लावल्या जातात.
यावेळी ते म्हणाले की, राज्यात आणि देशात गद्दारी कोणालाच आवडलेली नाही. याआधी अनेक लोकांनी त्यांची राजकीय विचारसरणी बदलली, पक्ष बदलले मात्र त्यांनी आपल्या आमदारकी किंवा खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतरच ते दुसऱ्या पक्षात गेले आणि निवडणुकीला सामोरे गेले. मात्र सहा महिन्यांपूर्वी जे घाणेरडं राजकारण राज्यात घडलं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. त्यामुळे आजही महाविकास आघाडीच्या सभेला लोकांची गर्दी दिसून येते. कारण लोकांचा विशेषतः महिलांचा विश्वास महाविकास आघाडीवर आहे. याउलट घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला फक्त रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते. कारण त्यांनी खुर्च्यांसाठी गद्दारी केली.
विचारसरणी वेगवेगळी असली तरी आम्ही केवळ खुर्चीसाठी नाही तर महाराष्ट्रातील लोकांसाठी एकत्र आलो. गद्दार गँगच्या मागे भाजपची महाशक्ती आहे. आपला महाराष्ट्र पुढे जाऊन प्रगती करत होता हेच त्यांच्या पोटात दुखत होतं. यासाठीच त्यांनी एका व्यक्तीला पुढे आणलं आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीत 40 वार केले आणि सरकार पाडलं. मी जिथे जातो तिथे लोकं मला बोलतात की आम्हाला महाविकास आघाडीची गरज आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी पर्यटनासाठी भरघोस मदत तरतूद करून ठेवली होती. लॉकडाऊनच्या काळात देखील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी साडे चौदा हजार कोटींची मदत केली. केवळ तरतूद केली नाही तर ही मदत शेतकऱ्यांच्या घरोघरी पोहोचवली. दोन लाखांपर्यंत कर्ज सरकारने माफ केलं होतं. मात्र आताच्या घटनाबाह्य सरकारने अजूनही अतिवृष्टीची मदत लोकांपर्यंत पोहोचवली नाही. लॉकडाऊन असतानाही महाविकास आघाडीने साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. त्यामुळे रोजगार निर्माण झाले. पुढील १० वर्षांसाठी ही गुंतवणूक राज्यासाठी महत्वाची ठरणार आहे. असे आदित्य ठाकरे म्हणाले.
































































