पुणे – लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा प्रियकराकडून खून

लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणाने एका 16 वर्षीय मुलीचा वायरने गळा आवळून खून केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा परिसरात उघडकीस आली आहे.

हत्या केल्यानंतर तरूणाने पोलिस ठाण्यात हजर होऊन स्वतः खुनाची माहिती दिली. सागर वानखडे (वय 28, पेरणे फाटा, मूळ, बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी सुरज गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वानखडे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस उपनिरीक्षक वराळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील आहे. तर मुलगी मुंबईची आहे. सागर पेरणे फाटा येथील एका तूप बनविणाऱ्या कंपनीत काम करतो. गेल्या काही दिवसांपासून दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते.

मात्र, सागर मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातच गुरुवारी दुपारी मुलगी कोणासोबत तरी फोनवर बोलत होती. त्यामुळे सागरला राग आला. त्यातूनच त्याने वारयने गळा आवळून मुलीचा खून केला. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या