
लग्न जमलं की वधू-वराच्या पालकांना सर्वात पहिली चिंता सतावते ती मंगल कार्यालयाची. कोणत्या मंगल कार्यालयात लग्न करायचं, तिथे तारखा उपलब्ध आहेत का, अशी सगळी धावपळ सुरू होते.
परंतु आलिशान मंगल कार्यालयच थेट तुमच्या दारात येऊन उभं राहिल तर? ऐकून गंमत वाटत असली तरी एका पुणेकराने हे शक्य करून दाखवलं आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या या ट्रकवर उभारलेल्या चालत्या फिरत्या मंगल कार्यालयाची चर्चा आहे.
गेली 20 वर्षे मंडप डेकोरेटर म्हणून व्यवसाय करणारे दयानंद दरेकर यांनी हे चालतं फिरतं मंगल कार्यालय उभारलं आहे. ज्या व्यक्तींना महागडे हॉल परवडत नाहीत त्यांच्यासाठी हा स्वस्तात मस्त पर्याय आहे.
वातानुकूलित प्रशस्त हॉल आणि आकर्षक विद्युत रोषणाईची सुविधा आदी सुविधा यात आहेत. हे मंगल कार्यालय उभारण्यासाठी 50 लाख रुपये खर्च आल्याचे दरेकर सांगतात.



























































