
शहरातील प्रसिध्द जेवणाच्या थाळीच्या ऑफरचा मोह एकाला तब्बल 31 हजारांना पडला आहे. जेवणाच्या एका थाळीवर दोन थाळ्या मोफत असल्याचे सांगून सायबर चोरट्याने तब्बल 31 हजार 137 रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेतल्याचा प्रकार घडला आहे.
मोहमंद इराफात सैद आलम नियाजी (रा. वैगनाबाद, नालंदा, बिहार) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक जगदाळे मोबाईवर फेसबुक सर्च करत होते. त्यावेळी सायबर चोरट्याने त्यांना पुण्यातील प्रसिध्द जेवणाची 250 रूपयांची थाळी घेतल्यास त्यावर दोन थाळी मोफत मिळतील अशी बतवाणी केली. त्याच्यावर विश्वास ठेऊन जगदाळे यांना मोबाईलवर लिंक आल्यानंतर माहिती भरली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातील 31 हजार रूपये आरोपीने काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी जगदाळे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्ह्यात चौकशी होऊन सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































