कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन हजारांवर गुन्हेगारांची झाडाझडती; शस्त्र, गावठी दारू, अमली पदार्थ जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून सोमवारी मध्यरात्री विशेष मोहिम (कोम्बिंग ऑपरेशन) राबविण्यात आली. त्यामध्ये 2 हजार 924 जणांची झाडाझडती घेण्यात आली, त्यापैकी 614 सराइत काही ठिकाणी वावरत असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्याशिवाय आरोपींकडून शस्त्रे, गावठी दारू, अमली पदार्थ जप्त करण्यात आला.

गुन्हे शाखेतील विविध पथकांनी शहरातील विविध भागात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या 11 जणांना अटक करून शस्त्रास्त्र जप्त केली. अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या पथकाने लोणी काळभोर भागात छापा टाकून गांजा जप्त केला. त्याशिवाय बेकायदा गावठी दारू विक्री प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 30 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तसेच 41 सराइतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त आयुुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, उपायुक्त सागर पाटील, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, उपायुक्त नम्रता पाटील, उपायुक्त रोहिदास पवार, उपायुक्त राहुल श्रीरामे, एसीपी गजानन टोम्पे, एसीपी नारायण शिरगावकर यांच्या पथकाने केली.

”सराइतांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून प्रतिबंधात्मक कारवाईमुळे सराइतांवर जबर बसण्यास मदत होणार आहे.”

अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त