
पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगने धुमाकुळ घातल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाचप्रकारे जुन्या वादातून टोळक्याने एकाच्या डोक्यात आणि हातावर पालघनने वार करुन हवेत कोयते फिरवल्याची घटना 16 जानेवारीला मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास शिवाजीनगरमध्ये घडली आहे.
सतिश भिमा काळे (वय 41, रा.शिवाजीनगर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी तुषार काकडे, मोन्या कुचेकर, दिपु शर्मा , दादया बगाडे (सर्व रा.हडपसर ) याच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराईत आरोपी दिपु शर्मा यास अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व तक्रारदार सतीश एकमेकांचे ओळखीचे असून त्यांच्यात चार महिन्यापूर्वी किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरुन टोळक्याने 16 जूनला मध्यरात्री सतिश यांच्या घराजवळ येउन आरोपी तुषार काकडे व दिपु शर्मा यांनी कोयता हवेत फिरवुन मोठमोठयाने आरडाओरडा केला. दहशतीमुळे रस्त्याने जाणारे लोक घाबरुन पळून गेले. त्यानंतर हल्लेखोर दादया बगाडे याने पालघनने सतिश यांच्या हातावर वार करुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काळे यांनी त्यास मला का मारतो असे विचारले असता, त्याने दुसरा वार त्यांच्या डोक्यात करुन खूनाचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोर मोटारसायकलवरुन पसार झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. तरडे करत आहे.
























































