
पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कायदा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. एकाच आठवड्यात तीन खून, सोनसाखळी चोरट्यांचा हैदोस, घरफोड्यांचे सत्रामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच मोटारीतून जाणाऱ्या एका तरुणीला सिग्नलवर अडवून कोयत्याने धाकाने लुटण्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना 27 सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास कोथरुड ते चांदणी चौक परिसरात घडली. याप्रकरणी देवर्षी जोशी (वय 22) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवर्षी भुसारी कॉलनीत राहायला असून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. 27 सप्टेंबरला ती मित्रांना भेटण्यासाठी कोथरुडमधील मोरे विद्यालयाजवळ गेली होती. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ती मोटारीतून घरी जात होती. त्यावेळी भारतीनगर परिसरात सिग्नल लागल्यामुळे देवर्षीने मोटार थांबविली. त्याचवेळी मोटारीच्या डाव्या बाजूने एक तरुण देवर्षीच्या गाडीत बसला. त्याने तिला कोयत्याचा धाक दाखवून यु-टर्न घेण्यास सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत देवर्षीने यु-टर्न घेतला. हातात कोयता असलेल्या तरुणाने देवर्षीला दोनदा कोथरुडमध्ये फिरविले. त्यानंतर त्याने मोटार चांदणी चौकात नेण्यास सांगत देवर्षीला पैसे मागितले. मात्र, तिच्याकडे रोकड नसल्यामुळे तिने एटीएममधून पैसे काढून देते असे तरुणाला सांगितले. त्यामुळे चांदणी चौकातील गणेश भेळ परिसरात देवर्षीने मोटार थांबवून आरडा-ओरडा करीत वेगाने पळ काढला. त्यानंतर कोयताधारी तरुणाने मोटारीतून पळ काढला. घाबरलेल्या अवस्थेत देवर्षीने परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती दिली.
मित्रांना भेटल्यानंतर संबंधित तरुणी घरी जात होती. त्यावेळी सिग्नलला एका कोयताधारी आरोपी तिच्या मोटारीत बसला होता. कोयत्याने धाकाने त्याने तिला पैसे मागितले होते. एटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने तरुणीने सुटका करून घेतली. याप्रकरणी तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीचा शोध सुरू आहे.
-चंद्रकांत कामठे, पोलीस उपनिरीक्षक, कोथरुड पोलीस ठाणे


























































