
सामना ऑनलाईन, पुणे
भाजपने मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक शहरात विजय संकल्प बाईक रॅली काढली होती. या रॅलीमध्ये हेल्मेट न घालता सहभागी होणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पुण्याच्या वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की या रॅलीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून ज्यांनी नियमाचे उल्लंघन केले आहे त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल.
पुण्यामध्ये सध्या विकासकामे जोरात सुरू आहे. मेट्रो प्रकल्प हा त्यातील एक महत्वाचा आणि मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पांसाठी वाहतूक विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज असते, कारण या प्रकल्पांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. जर प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही तर कंत्राटदाराला वाहतूक विभागाकडून देण्यात येणारे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतही विचार केला जाऊ शकतो असे देशमुख यांनी सांगितलं. देशमुख यांनी वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पदाचा भार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नियम तोडणाऱ्यांविरोधात काय कारवाई केली जाईल या प्रश्नांना वरील उत्तरे दिली.
































































