
भर रस्त्यावरच विनाकारण भांडण करत सहकारी पोलिसाला मारहाण करून पोलिस खात्याची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यातील शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. शहरातील पौड फाटा परिसरात 10 मेला ही घटना घडली होती. पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी त्याच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. विजयकुमार पाटणे असे निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पौड फाटा परिसरात 10 मेला रात्री दहाच्या सुमारास पोलिसांकडून विना मास्क कारवाई सुरू होती. त्यावेळी पाटणे कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मास्क कारवाईसाठी नेमणूक असताना ते पौड फाटा परिसरात गेले होते. त्यावेळी पोलिस शिपाई श्रावण शेवाळे हे फोनवर कोणाशी तरी बोलत होते. त्यावेळी पाटणे पाठीमागून त्यांच्याजवळ गेले. ‘धक्का का दिला’ असे म्हणून त्यांनी शेवाळे यांच्याशी वाद घालत मारहाण केली. पोलिस कर्मचारी रमेश चौधरी यांनी भांडणात मध्यस्थी केली. झटापटीत त्यांच्या हाताला मार लागला. भररस्त्यात दोन पोलिसांची मारामारीची नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा झाली होती. शेवाळे यांनी धक्का दिला नसताना पाटणे यांनी वाद घालून त्यांना मारहाण केली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात स्टेशन डायरीत घटनेची नोंद करण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी घटनेचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार बेजाबदारपणाचे वर्तन केल्याचा ठपका ठेऊन पाटणे यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.































































