
यंदा घोषित करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. 2020 आणि 2021 या दोन्ही वर्षांचे पुरस्कार यंदा वितरित करण्यात आले. हिंदुस्थानची महिला बॉक्सर मेरी कोम हिला पद्मविभूषण पुरस्काराने तर ऑलिम्पिक डबल पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकले होते. याशिवाय तिने पाच वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक तसेच एक रौप्य आणि कास्यपदक जिंकले आहे. तर टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये कास्यपदक जिंकणारी हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिक 2016मध्येही रौप्यपदक तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकले होते. हिंदुस्थानचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला पद्मश्री पुरस्कार 2020ने सन्मानित करण्यात आले. झहीर खानची गणना सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. मणिपूरची फूटबॉलपटू ओइनाम बेंबिम देवी हिला पद्मश्री पुरस्कार 2020ने सन्मानित करण्यात आले आहे. माजी हॉकीपटू एम. पी. गणेश यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेमबाज जितू राय यांना पद्मश्री पुरस्काराने बहुमानित करण्यात आले. तिरंदाज तरुणदीप राय यांना पद्मश्री पुरस्काराने, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

























































