विचारा तर खरं…

>> उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक

वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका [email protected] या ई-मेलवर पाठवा.

राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) यातील टियर 1 आणि टियर 2 या खात्यांमध्ये नेमका काय फरक आहे? – प्रताप जोशी, कळवा, ठाणे

उत्तर ः यात असलेले टियर 1 खाते हे आपली निवृत्ती निर्वाहन योजना बनवण्याचे खाते असून त्यातील गुंतवणूक वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर कधीही काढता येते. काही विशिष्ट कारणांसाठी तीन वर्षे पूर्ण झाल्यावर पाच वर्षांच्या अंतराने काही रक्कम पूर्ण कालावधीत जास्तीत जास्त तीनदा काढता येण्याचा पर्याय त्यात आहे. अंतिम रक्कम काढून घेताना त्यातील 60 टक्के रक्कम करमुक्त असून किमान 40 टक्के रक्कम ही चालू असलेल्या पेन्शन देणाऱया योजनेत गुंतवावी लागते. या खात्यातील जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवणुकीवर जुन्या कर प्रणालीनुसार आयकरात सवलत मिळते. टियर 2 खाते हे बचत खात्यासारखे असते. म्युच्युअल फंडाच्या निरंतर (ओपन एंड) योजनांसारखे त्याचे कार्य चालते. त्याचा परिचालन खर्च अत्यंत कमी आहे. या खात्यात कधीही रक्कम जमा करता येते किंवा काढून घेता येते. रक्कम काढून घेताना त्यावर बाहेर पडण्यास लागू असलेले निर्गमन शुल्क (एक्झिट लोड) घेतले जात नाही. हे खाते काढायलाच हवे अशी सक्ती नाही. एका आर्थिक वर्षात टियर 1 मध्ये किमान एक हजार रुपये आणि टियर 2 मध्ये दोन हजार रुपये जमा करण्याचे बंधन आहे. याशिवाय कोणतीही उच्चतम मर्यादा नाही. आपल्या गरजेनुसार या दोन्ही खात्यांचा सुयोग्य वापर करता येणे शक्य आहे.

माझे वडील त्यांच्या डी मॅट खात्यात असलेले शेअर्स मला भेट म्हणून देऊ इच्छितात. त्यावर त्यांना किंवा मला लगेच काही कर द्यावा लागेल का? भविष्यात त्यावर कर आकारणी कशी केली जाईल?
 योगेश रानडे, बंगळुरू

उत्तर ः आपल्याला भेट म्हणून मिळणारे शेअर्स हे देशांतर्गत शेअर बाजारात नोंदवलेले आहेत असे मी समजून या प्रश्नाचे उत्तर देत आहे. प्रचलित आयकर कायद्यानुसार मिळालेली भेट/ देणगी चालू बाजारभावाप्रमाणे रुपये 50 हजारांहून अधिक किमतीची असल्यास भेट स्वीकारणाऱयाच्या उत्पन्नात मिळवली जाते आणि त्यानुसार कर मोजणी होते. यास रक्ताचे आणि जवळचे नातेवाईक अपवाद आहेत. त्यामुळे प्रस्तावित भेटीचे बाजार मूल्य कितीही असले तरी त्यावर तुम्ही किंवा तुमचे वडील यांना आयकर द्यावा लागणार नाही. हे शेअर्स जेव्हा तुम्ही विकाल, त्या वेळी वडिलांनी कधी कोणत्या भावाने खरेदी केले ती त्याची खरेदी किंमत धरली जाईल. जे शेअर्स 31 जानेवारी 2018 रोजी किंवा त्यापूर्वी खरेदी केले आहेत त्यांची खरेदी किंमत ही कितीही कमी असली तरी त्या तारखेची सर्वोच्च किंमत ही सुयोग्य खरेदी किंमत म्हणून मानता येते. त्यांनी आणि तुम्ही मिळून शेअर्स धारण केलेला काळ एक वर्षाहून कमी असेल तर अल्पमुदतीचा भांडवली लाभ समजून त्यावर 15 टक्के या सवलतीच्या दराने कर आकारणी होईल. हाच कालावधी एक वर्षाहून अधिक असल्यास होणारा नफा हा दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ समजून एक लाखाहून अधिक रकमेवर 10 टक्के या सवलतीच्या दराने कर आकारणी होईल. आपल्याला सदर शेअर्स भेट म्हणून दिल्याचे तपशीलवार पत्र (कंपनीचे नाव, आयएसआयएन क्रमांक, शेअर्सची संख्या, भेट देण्याचा आधीच्या दिवसाचा बाजारभाव) अथवा मेल आपल्या वडिलांकडून घ्यावा आणि तो जपून ठेवावा. मिळणाऱया भेटीचे मूल्य अधिक असल्यास आयकर विवरणपत्र भरताना त्याचा उपयोग होईल अन्यथा संदर्भ म्हणून ही माहिती कायमची आपल्याकडे राहील.