तीन हजार लसी असतानाही सर्पदंशाचे रुग्ण दगावले कसे, नांदेडच्या रुग्णालय प्रशासनावर संशय

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूंमध्ये सर्पदंशाच्या रुग्णांचाही समावेश होता. या रुग्णालयाला सरकारने हाफकिन संस्थेकडून घेतलेल्या सर्पदंश प्रतिबंधक 3570 लसी गेल्या मार्चमध्ये पुरवण्यात आल्या होत्या. इतक्या लसी असतानाही सर्पदंशाचे रुग्ण दगावले कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  नांदेडचे रुग्णालय प्रशासनही संशयाच्या भोवऱयात  आहे.

राज्य सरकारने  शासकीय रुग्णालयांना औषधे पुरवण्यासाठी खरेदी कक्ष स्थापन केला. त्याचा कारभार परळच्या हाफकिन संस्थेमधून चालतो. या खरेदी कक्षाने  30 मार्च रोजी r हाफकिनकडून सर्पदंश प्रतिबंधक लसी विकत घेतल्या. प्रत्येक लसीची किंमत 560 रुपये होती. अशा 3 कोटी 46 लाख 94 हजार 240 रुपयांच्या 61 हजार 954 लसी घेण्यात आल्या.   19 वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये आणि आरोग्य युनिटना या लसी पुरवण्याल्याचे खरेदी कक्षाचे महाव्यवस्थापक डॉ. अनंत शिंगारे यांनी सांगितले. घटना घडली त्या नांदेडच्या शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील श्री गुरू गोविंदसिंग रुग्णालयाला 3570 लसी मागणीप्रमाणे पुरवण्यात आल्या होत्या.

कमिशनसाठी खासगी कंपन्यांकडून खरेदी

खरेदी कक्षाने जास्तीत जास्त औषधे हाफकिन संस्थेकडून विकत घ्यावीत असा सरकारचा आदेश असतानाही खरेदी कक्षाकडून अभया लॅब, सिरम, भारत सिरम आदी खासगी कंपन्यांकडून लसींची अधिक खरेदी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. खरेदी कक्षाबाहेर खासगी कंपन्यांच्या दलालांचा सातत्याने वावर असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे खरेदी कक्षाला औषध खरेदीसाठी सरकारकडून निधी देण्यात येतो. त्यातील शेकडो कोटी रुपयांचा निधी खरेदी कक्षाने वापरलाच नसल्याचेही समोर आले आहे.

व्यवस्थापकीय संचालकांच्या गैरहजेरीचा हाफकिनला तोटा

हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे हे प्रभारी असून त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए)ही जबाबदारी आहे. ते हाफकीनला उपस्थित राहत नसल्याने त्यांना हाफकिनकडून होणाऱया औषध निर्मिती व पुरवठय़ाची काहीच माहिती नाही. त्यांना आज दुपारी संपर्क केला असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो असे सांगितले. मात्र खरेदी कक्षाचे डॉ. शिंगारे यांनी सकाळीच काळे यांना संपूर्ण माहिती दिल्याचे सांगितले.