जिल्हाधिकाऱ्यांच्या जुन्या कार्यालयात विखे-पाटलांचे खासगी जनसंपर्क कार्यालय! सत्तारांच्या तक्रारीची लोकायुक्तांनी घेतली दखल

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचे कार्यालय थाटल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर नगर जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या जुने कार्यालयाच्या ठिकाणी खासगी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. महसूल विभागाकरिता, सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांना शासकीय कार्यालय उपलब्ध आहे. हे कार्यालय असतानाही विखे पाटील यांनी नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या जुन्या कार्यालयात खासगी जनसंपर्क कार्यालय सुरू केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता शेख शाकीर अब्दुल सत्तार यांनी केली आहे. शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून लोकायुक्त विद्यासागर कानडे यांनी या प्रकरणावर 12 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.

नगर जिल्ह्यात नूतन जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर रोडवरील शासकीय विश्रामगृह हे नवे कार्यालय बांधण्यात आले आहे. यामुळे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय दंडाधिकारी, नगर याचे कार्यालय आणण्यात आले आहे. तक्रारदाराने म्हटले आहे की, महसूल मंत्री विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन अधिकारी यांना खासगी जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करण्याबाबत तोंडी निर्देश दिले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी त्याला मान्यता दिली. सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांना त्याच्या विभागासाठी मंत्रालयात दालन, कार्यालय दिले जाते. मात्र राज्यातील कोणत्याही पालकमंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये खालगी जनसंपर्क कार्यालयाकरिता जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद नाही असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. विखे-पाटील यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून हे कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाला वीज व इतर सुविधा शासकीय विभागामार्फत पुरवण्यात येत आहे. यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होत असून सदरचा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा आणि विखे-पाटील यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार शेख यांनी केली आहे.