अज्ञात रोगाने 18 शेळय़ांचा मृत्यू, राधानगरी तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील कासारवाडापैकी बोक्याचा धनगरवाडा येथील वाडय़ावर शेळ्या-मेंढय़ा आजारी पडून मृत्युमुखी पडत आहेत. अनेक शेळ्या आजारी आहेत. आत्तापर्यंत जानू बाबू कोळापटे यांच्या 10 आणि जानू बाबू पटकारे यांच्या 8 शेळ्यांचा आजारी पडून मृत्यू झाला आहे.

याबाबत पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पठाण यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांना माहिती देण्यात आली असून, पथक पाठविण्याची विनंती ग्रामस्थांनी केली आहे. यानंतर डॉ. पठाण यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांची टीम पाठवून दिली. डॉक्टरांनी वाडय़ावरील शेळ्यांची तपासणी करून औषधोपचार केले. तसेच, मेलेल्या शेळ्यांचे पोस्टमार्टेम केले व नुमने तपासणीसाठी सोबत घेऊन गेले. तसेच, आजारी शेळ्यांचे रक्तही तपासणीसाठी नेण्यात आले आहे.

या कामी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, संदीप झोरे, अभिजित कोळापटे व बाबुराव कोळापटे यांनी भेट देऊन पाहणी केली.