
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
गांधी घराण्याला देशाच्या सुरक्षिततेशी काहीही घेणेदेणे नाही. गांधी घराण्याला फक्त पैशाची भाषा कळते. त्यांना पैशाचे गणित समजते. राहुल गांधी खोटारडे आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते खोटेनाटे आरोप करीत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पलटवार केला.
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि अज्ञात व्यक्तीमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप खरी आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी देत आहेत आणि ब्लॅकमेलिंग करीत आहेत का? असा सवाल करीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढविला. राफेल प्रकरणावर समोरासमोर येऊन फक्त 20 मिनिटे चर्चा मोदींनी करून दाखवावी असे खुल्लं आव्हानच राहुल गांधींनी दिले आहे.
मोदींनी ‘राफेल’वर समोरासमोर येऊन फक्त 20 मिनिटं चर्चा करावी!
राफेल करारावरून लोकसभेत हल्लाबोल केल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत पुन्हा पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. ‘चौकीदार ही चोर हैं’ या आरोपाचा त्यांन पुनरुच्चारही केला. राहुल गांधी म्हणाले, गोवा सरकारमधील मंत्री विश्वजित राणे हे ऑडिओ टेपमध्ये स्पष्ट बोलत आहेत की पर्रीकरांनी सांगितले की राफेलच्या फायली त्यांच्याकडे आहेत आणि मला कोणी हटवू शकत नाही. आता प्रश्न असा आहे की पर्रीकरांच्या बेडरूममध्ये कोणत्या फायली आहेत आणि याचा पंतप्रधान मोदींवर काय परिणाम होणार आहे.
मोदी लपू शकत नाहीत
राफेलवरील चर्चेवेळी पंतप्रधान मोदी घरी जाऊ शकतात; पण ते लपून राहू शकत नाहीत. मोदींनी करार बदलला हे देशाला माहीत झाले आहे. जेवढे सत्य लपवाल तेवढे तथ्य आणखीन बाहेर येतील असेही राहुल गांधींनी फटकारले.
राहुल गांधींच्या भाषणानंतर सरकारच्या वतीने अर्थमंत्री जेटली यांनी उत्तरे दिली. यावेळी जेटली संतापले होते. जेटली यांनी गांधी कुटुंबावर व्यक्तिगत टीका केली. बोफोर्स, क्वात्रोची, ऑगस्टा वेस्टलॅण्ड, हेरॉल्ड प्रकरणाचे दाखले त्यांनी दिले.
राहुल गांधी यांनी अनिल अंबानींचे नाव न घेता ‘ए. ए.’ असा उल्लेख केला. त्यावर जेटली म्हणाले, तुम्ही मिस्टर क्यूच्या (क्वात्रोची) बगलेत खेळत होतात का?
काय घडलं संसदेत?
- मनोहर पर्रीकरांच्या वक्तव्याचा हवाला देऊन काँग्रेसने प्रसिद्ध केलेली ऑडिओ टेप बनावट आहे. त्यात तथ्य नाही.
- राफेल विमाने ही देशाची गरज आहे. कारगील युद्धानंतर हवाई दलाने अत्याधुनिक विमानांची मागणी केली होती.
- यूपीए सरकारला राफेलचा करार पूर्ण कसा झाला नाही. त्यांनी देशाच्या सुरक्षेची खेळ केला.
- राहुल गांधींना लढाऊ विमानातले काहीही कळत नाही. त्यांचे ज्ञान बालवाडीतील मुलाचे आहे. ए, बी, सी, डीपासून सुरुवात करावी लागेल.
- राफेल करार हा दोन्ही देशांमधील सरकारमध्ये झालेला करार आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रियेचे पालन केले. सुप्रीम कोर्टाचेही समाधान झाले आहे.
- यूपीए सरकारपेक्षा आमच्या सरकारने केलेला करार नऊ टक्क्यांनी स्वस्त आहे. त्यासाठी 74 बैठका घेण्यात आल्या.
- राहुल गांधी सहा महिन्यांपासून सातत्याने खोटे बोलत आहेत. गांधी घराण्याला पैशाची भाषा कळते, गांधी घराण्याला पैशाचे गणित समजते.


























































