
सामना प्रतिनिधी, मुंबई
मी आता जिथे आहे तिथे खूश आहे. मात्र, हिंदुस्थानात माझ्यालायक एखादी संधी मिळाल्यास मी पुन्हा मातृभूमीची सेवा करायला तयार असेन, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. मंगळवारी रात्री दिल्लीत त्यांच्या ‘द थर्ड पिलर’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते.
शिकागो विद्यापीठात राजन अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. हिंदुस्थानात विरोधी पक्षांची सत्ता आल्यास राजन यांना देशाचे अर्थमंत्री बनवले जाईल, अशी सध्या चर्चा आहे. याबाबत हिंदुस्थानात राजकारण किंवा सार्वजनिक क्षेत्रात पुन्हा संधी मिळाली तर तुम्ही काम कराल का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी आपण देशासाठी काम करण्यास तयार असल्याचे सांगितले. अर्थमंत्री बनवण्याच्या चर्चांबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘देशात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे सध्या तरी चर्चा न केलेलीच बरी,’ असे ते म्हणाले.


























































