फसवी आश्वासने हवी तर मोदींना ऐका; सत्य जाणायचे असेल तर माझी भाषणे ऐका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi

सामना ऑनलाईन । भोपाळ

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशातील बासौदा आणि रायसेनमध्ये जनसभा घेतल्या. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर कडाडून टीका केली. ‘पोकळ शब्द आणि फसवी आश्वासने ऐकायची असतील मोदीजी आणि शिवराज सिंह चौहान यांची भाषणे ऐका. मात्र, सत्य जाणून घ्यायचे असेल तर माझी भाषणे ऐका’ अशा शब्दांत राहूल यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर हल्ला चढवला.

शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाचे नाव आपण पनामा पेपर्समध्ये घेतले तर त्यांनी मला मानहानीची नोटीस पाठवली. मात्र, व्यापम, मिड डे मिल, ई टेंडरिरग आणि खाण घोटाळ्याबाबत आपण बोलतो तेव्हा शिवराज माझ्यावर मानहानीचा खटका का दाखल करत नाही असा खरमरीत सवालही त्यांनी केला. मध्य प्रदेश सरकराने जनतेच्या पैशांची चोरी केली आहे, असा आरोपही राहूल यांनी केला. नवी दिल्लीला मोदी यांनी आणि मध्य प्रदेशला शिवराज यांनी भ्रष्टाचाराचे केंद्र बनवले आहे, असेही ते म्हणाले. शेतकरी संकटात आहे, तरुणांना रोजगार नाही,सामान्य जनता वाढत्या महागाईने त्रस्त आहे आणि भाजपवाले भ्रष्टाचार करत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव, तरुणांना रोजगार आणि महागाई हटवण्याचे आश्वासन देत मोदी सरकार सत्तेवर आले. मात्र, आता ते भाषणात या मुद्द्यांचा उल्लेखच करत नाही असेही राहूल यांनी सांगितले. राफेल करार, सीबीआय घोटाळा आणि उद्योगपतींना कर्जमाफी या मुद्द्यावरूनही राहूल यांनी केंद्रावर चौफेर टीका केली.

राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचा मुख्यमंत्री 18 तास तरुणांना रोजगार मिळण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.