टाळ्या वाजवून परिस्थिती सुधारणार नाही, आर्थिक मदत जाहीर करा; राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

1216

अडचणीचा सामना करणारी देशाची अर्थव्यवस्था कोरोनामुळे आणखी लयाला जाणार आहे. लहान आणि मध्यम स्वरूपातील उद्योग आर्थिक संकटामुळे बंद पडतील अशी भीती आहे. त्यामुळे या संकट काळात नुसत्या टाळय़ा आणि थाळी वाजवून परिस्थिती सुधारणार नाही अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. तसेच सध्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱया उद्योगांना केंद्र सरकारने मोठी आर्थिक मदत जाहीर करून आधार द्यावा असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. त्याचा प्रादुर्भाव हिंदुस्थानात वाढला आहे. त्याला अटकाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या रविवारी देशभर जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच सायंकाळी टाळय़ा वाजवून, थाळी वाजवून कोरोनाविरोधात लढणाऱया कर्मचाऱयांना प्रोत्साहन द्यावे असे स्पष्ट केले आहे. त्यावर राहुल गांधी यांनी थेट टीका केली आहे. आज छोटे व्यावसायिक, कामगार वर्ग आर्थिक संटकात आहे. त्यांना मदतीचा हात हवा आहे. त्यासाठी सरकारने थेट आर्थिक मदत, कर सवलत अशा विविध मार्गाने तत्काळ मदत करायला हवी असे म्हटले आहे. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने लघुउद्योग, पर्यटन, पशुपालन अशा विविध विभागांची नुकतीच बैठक घेतली आहे. मात्र कधी मदत केली जाणार याबाबत सरकारने अद्याप स्पष्ट केले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या