Video – मोदींनीही दिल्लीला म्हटले होते ‘रेप कॅपिटल’, राहुल गांधीनी शेअर केला व्हिडीओ

1354
rahul-gandhi-modi

झारखंडमध्ये प्रचारादरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘रेप इन इंडिया’ अशी टीका केंद्र सरकारवर केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपच्या महिला खासदारांनी संसदेत गदारोळ करत राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. मात्र त्या वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी माफी मागण्यास नकार देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 2014 मध्ये दिल्लीला ‘रेप कॅपिटल’ म्हटल्याची आठवण करून दिली आहे. मोदींनी देखील निवडणूकीच्या प्रचारसभेत हजारो लोकांसमोर दिल्लीला रेप कॅपिटल म्हटले होते. त्यांच्या त्या भाषणाचा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. तसेच यावेळी त्यांनी ईशान्य हिंदुस्थानात जो आगडोंब उसळला आहे त्यावरून लक्ष हटविण्यासाठी भाजपने माझ्या वक्तव्याचा वापर केल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.

‘भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ईशान्य हिंदुस्थानला पेटवलं आहे. त्या गोष्टीवरून सर्वांचं लक्ष हटविण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजप माझ्यावर हे आरोप करताहेत. मी बोललो होतो की, नरेंद्र मोदींनी सांगितलेलं मेक इन इंडिया होणार. आम्हाला वाटलेलं की वृत्त पत्रांमध्ये मेक इन इंडियाच्या बातम्या असतील पण आज जेव्हा आम्ही वृत्तपत्र वाचतो त्यात फक्त रेप इन इंडिया दिसतो. एकही राज्य असे नाही जिथे बलात्कार होत नाही. उन्नावमध्ये भाजपच्या आमदारानेच महिलेवर बलात्कार केला. पीडितेच्या गाडीचा अपघात घडवला. त्यावर नरेंद्र मोदीजींनी एक शब्दही काढला नाही’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपला फटकारले आहे.

यावेळी त्यांनी नागरिकत्व विधेयकावरून सुरू असलेला हिंसाचार, ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढते बलात्कार यावरून देखील मोदी सरकारला फटकारले आहे. ‘नरेंद्र मोदी हे हिंसेचा प्रचार करतात. आज संपूर्ण हिंदुस्थानात हिंसा सुरू आहे. महिलांवर हिंसाचार सुरू आहे. इशान्येकडील राज्यात हिंसाचार सुरू आहे, कश्मीरमध्ये हिंसाचार सुरू आहे. आपली सर्वात मोठी ताकद आपली अर्थव्यवस्था होती. काही दिवसांपूर्वी मला रघुराम राजन मला भेटले व त्यांनी सांगितले की अमेरिका, युरोपमध्ये हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर चर्चाच होत नाही. चर्चा होते ती फक्त हिंसाचार, अत्याचार या गोष्टींवर. हेच मी माझ्या भाषणाच बोललो होतो. आता यावर नरेंद्र मोदींना उत्तर द्यावे लागले. देशाची अर्थव्यवस्था एवढी कशी खराब झाली? तरुण ज्यांच्याकडे रोजगार होता व ते आता बेरोजगार आहेत. त्यांचा रोजगार का हिरावून घेतला?, असा सवाल देखील राहुल गांधी यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या