“मिस्टर मोदी तुम्ही हवं ते म्हणा, आम्ही मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करू”, राहुल गांधींचे टीकास्त्र

पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी संसदेत ‘INDIA’ या शब्दावर बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांवर टीका केली. यावेळी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी आणि इंडियन मुजाहिदीनसारख्या नावांचा उल्लेख देखील केला. मात्र विरोधी पक्षांची आघाडी म्हणजे ‘इंडियाच’ मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करेल, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी विरोधी आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) वर टीका केली होती.

मोदींच्या या वक्तव्यावर आता राहुल गांधींनी पलटवार केला आहे, त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “आम्हाला तुम्ही जे हवं ते म्हणा. आम्ही इंडिया आहोत. आम्ही मणिपूरला पुन्हा उभं करण्यात मदत करू आणि प्रत्येक महिलेचे आणि मुलाचे अश्रू पुसू. आम्ही तेथील सर्व लोकांसाठी प्रेम आणि शांतता परत आणू. आम्ही मणिपूरमध्ये इंडियाची संकल्पना पुन्हा उभारू.”

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA विरुद्ध लढण्यासाठी 26 विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीला ‘भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी’ म्हणजेच INDIA असे नाव दिले आहे. याबाबत भाजप सातत्याने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीका करत आहे.