कोपरगाव, पारनेरमध्ये वाळूतस्करांवर छापे; 36 लाखांचा मुद्देमाल जप्त; चार आरोपींवर गुन्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळूउपसा आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत कोपरगाव शहर आणि पारनेर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाळूतस्करांवर छापे टाकले. या कारवाईत सहा ब्रास वाळू, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने, असा जवळपास 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आकाश संजय रोकडे (वय 29), अजय महादेव जाधव (वय 29, दोघेही रा. इंदिरानगर, कोपरगाव) आणि रवि सुनील सोनवणे (वय 18, रा. येसगाव, ता. कोपरगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अहिल्यानगर जिह्यात अवैध वाळूउपसा आणि वाहतुकीच्या वाढत्या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना विशेष कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार उपनिरीक्षक संदीप दरवडे, दीपक मेढे, विजय पवार, बाळासाहेब नागरगोजे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, प्रकाश मांडगे, अमोल आजबे, सतीश भवर, विशाल तपनुरे, चालक उत्तरेश्वर मोराळे आणि अरुण मोरे यांची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी 30 जून रोजी कोपरगाव शहर आणि पारनेर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सापळा वाळूतस्करांवर कारवाई केली.

कोपरगाव शहरातून वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने छापा टाकत वाळूसह वाहतुकीसाठी वापरलेले वाहन, असा 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. येथे तिघांवर गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या कारवाईत पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ब्रास वाळूची अवैध वाहतूक करताना दत्तात्रय नाना मेंगाळ (वय 21, रा. खडकवाडी, ता. पारनेर) याला ताब्यात घेतले. येथून 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिह्यात अवैध वाळूउपसा व वाहतुकीविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून, अशा बेकायदा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.