जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सुसज्ज शाखेचे उद्घाटन, इंडिया आघाडीचे दिग्गज नेते आज रायगडात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुसज्ज शाखेचे उद्घाटन इंडिया आघाडीतील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी, शेकाप नेते व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्यासह आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची श्रीवर्धनमध्ये जय्यत तयारी सुरू असून त्याकडे सर्कांचेच लक्ष लागले आहे.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या संचालक निकडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने सर्वच्या सर्व जागा जिंकत विरोधकांचे पानिपत केले. या वेळी पुढील सर्व निवडणुका इंडिया आघाडी म्हणून लढणार असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. दरम्यान जिल्हा बँकेच्या श्रीवर्धन येथील शाखेचे कांचन अपार्टमेंट येथे स्थलांतर करण्यात येणार आहे. ही वास्तू बँकेच्या स्वमालकीची असून संपूर्ण इमारत सुसज्ज व वातानुकूलित असणार आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता इंडिया आघाडीतील दिग्गजांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, अनंत गीते, माजी खासदार हुसेन हलवाई, माजी आमदार मुश्ताक अंतुले, मीनाक्षी पाटील, पंडित पाटील, बाळाराम पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे नेते व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील व उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी दिली.