
सामना प्रतिनिधी । पालघर
वसई-डहाणू दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला प्रचंड फटका बसला आहे. त्यासोबतच प्रवाशांचे देखील हाल सुरू आहेत. दरम्यान, काल पासून उमरोळी रेल्वे स्थानकामध्ये गाड्या न थांबविल्याने स्थानिक प्रवाशांनी रेल रोको केला. दरम्यान, वैतरणा डहाणू रेल्वे प्रवासी सेवा संघाच्या महेश पाटील यांनी मध्यस्थी करून लांब पल्ल्याच्या गाड्या उमरोळी येथे थांबा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
लांब पल्ल्याच्या गाड्या या मार्गावरून आधी काढल्या जात आहेत. मात्र लोकल वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. त्यातच लांब पल्ल्याच्या गाड्या देखील या रेल्वे स्थानकावर थांबवल्या जात नाहीत. यामुळे प्रवासी रेल्वे प्रशासनावर वैतागले होते. अखेर संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला जाब विचारत रेल रोको आंदोलन छेडले. त्यानंतर वैतरणा डहाणू रेल्वे प्रवासी सेवा संघाच्या महेश पाटील यांनी मध्यस्थी केली. प्रवाशांच्या मागण्या त्यांनी रेल्वे प्रशासनाला सांगितल्या. त्यानंतर उमरोळी येथे थांबा देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनानं दिले. त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आलं.





























































