
देशभरातील रेल्वे स्थानकांवर आता प्लॅस्टीकच्या कपाऐवजी पर्यावरण स्नेही मातीच्या कुल्हडमधूनच चहा विकण्याचे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी दिले आहेत.
राजस्थानच्या अलवार जिह्यातील उत्तर पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱया नव्याने विद्युतीकरण झालेल्या ढीगावाडा-बांदीपुई सेक्शनच्या उद्घाटनासाठी ढीगावाडा रेल्वे स्थानकात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रेल्वेमंत्री गोयल यांनी ही घोषणा केली. या निर्णयाने प्लास्टीक मुक्त हिंदुस्थान करण्याच्या उद्दिष्ठात रेल्वेही आपला वाटा उचलेल असेही गोयल यांनी स्पष्ट केले.
सध्या देशभरातील 400 रेल्वे स्थानकात मातीच्या भांडय़ात म्हणजे ‘कुल्हड’मध्ये चहा विकला जातो आणि भविष्यात सर्व रेल्वे स्थानकांत कुल्हडमधून चहा विकला जावा अशी आमची योजना आहे. कुल्हडमुळे पर्यावरणाचे रक्षण होईलच शिवाय लोकांना रोजगार मिळेल असे गोयल शेवटी म्हणाले.





























































