रेल्वे परिसरात विनामास्क प्रवासी आढळल्यास आता 500 रुपयांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता इंडियन रेल्वे कायदा 2012 अनुसार रेल्वे परिसरात (ट्रेनसह) विनामास्क प्रवासी आढळल्यास त्याच्यावर आता 500 रुपयापर्यंतच्या दंडाची आकारणी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तिकीट तपासनीसांना हा दंड आकारण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. हा आदेश तातडीने लागू करण्यात आला असून पुढील सहा महिन्यांपर्यंत तो लागू असणार आहे.

यापूर्वी रेल्वे परिसरात विनामास्क प्रवाशांवर 200 रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. पालिकेच्या पथकामार्फत ही दंडवसुली करण्यात येत होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा आता दंडाच्या रकमेत 500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 11 मे 2020 रोजी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या ‘एसओपी’नुसार सर्व रेल्वे प्रवाशांनी रेल्वे परिसरात प्रवेश करताना आणि प्रवास करताना चेहऱयावर मास्क लावलेला असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कोविड-19 साथीत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे विषाणू हवेत पसरण्याची शक्यता असल्याने त्यामुळे थुंकणे बंद व्हावे तसेच नाकावर मास्क असणे बंधनकारक करण्यासाठी दंडाच्या रकमेत 500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.