
मागील काही दिवसांपासून विसावलेल्या पावसाने नगर, सांगलीसह सातारा जिह्यातील काही भागांत दमदार हजेरी लावली. दुष्काळाच्या उंबरठय़ावर असलेल्या या भागांना पावसाने दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, द्राक्ष, ऊस या पिकांना जीवदान मिळाले आहे. ऐन गणेशोत्सवात आलेल्या पावसामुळे शेतकऱयांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पावसामुळे काही प्रमाणात जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
जिह्यात दोन दिवस चांगला पाऊस झाला आहे. नगर शहरात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून जिह्यात पावसाने दडी मारली होती. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. पाऊस नसल्याने जिह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती.
पावसाचा हा शेवटचा महिना असून, गणेशोत्सवात पाऊस न झाल्यास दुष्काळ पडणार, अशी स्थिती होती. मात्र, गुरुवारी आणि शुक्रवारी कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर येथे जोरदार पाऊस झाला. दरम्यान, कर्जत तालुक्यातील कापरेवाडीत वादळी वाऱयाने गोठा जमीनदोस्त झाल्याने दोन जनावरे दगावली. श्रीरामपूर शहर व राहाता तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली. राहुरी शहरातही हलका पाऊस सुरू होता. या पावसाने जामखेड तालुक्यात नान्नज परिसरात काही शेतांमध्ये पाणी साचले होते. तसेच पाण्याअभावी जळ लागलेल्या पिकांना यामुळे संजीवनी मिळणार आहे.
नांदुर बंधाऱयातून 4000 क्युसेकचा विसर्ग
कोपरगाव ः तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱयांना दिलासा मिळाला असून, गणेशोत्सवात गुरुवारी व शुक्रवारी 2 ते 3 इंच पाऊस झाला असून, नांदुर मधमेश्वर बंधाऱयातून गोदावरी नदीत 4384 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. दारणा धरणात 7200, गंगापूर 5350, मुकणे 6114, वाकी 1783, भाम 2464, भावली 143, वालदेवी 1133, काश्यपी 1240, गौतमी 1413, पालखेड धरणात 533 दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा झाला आहे.
आणखी जोरदार पावसाची गरज
बऱयाच दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सांगली शहरात व जिह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. अचानक आलेल्या पावसामुळे वाहतूकदारांची तारांबळ उडली. या पावसामुळे जिह्यातील द्राक्ष, ऊस, सोयाबीन या पिकांना जीवदान मिळाले आहे.
आज शहरात आणि जिह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर पावसाने बरसण्यास सुरुवात केली. सांगली शहरात जवळपास दोन तास हा पाऊस बरसत होता. जिह्याच्या काही भागांत आज दमदार पाऊस झाला. सांगली शहरात झालेल्या या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. या पावसामध्येही गणेशभक्तांच्या आनंदाला उधाण आले. लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. कृष्णा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. त्यामुळे जिह्यात सध्या पावसाची मोठय़ा प्रमाणात गरज आहे. पाऊस पडावा, असेच साकडे अनेक भक्तांनी श्री गणेशाला घातले आहे.
औंधसह परिसरास पावसाने दीड तास झोडपले
मागील तीन महिने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या औंधसह परिसरातील बळीराजा, ग्रामस्थांना गणेशोत्सव व गौरीपूजनाच्या मुहूर्तावर दीड तास मेघगर्जनेसह पावसाने झोडपले. या जोरदार पावसाने चांगलाच दिलासा मिळाला असून, खरीप हातचा गेलेल्या बळीराजाच्या या पावसामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यंदा उन्हाळ्यात, तसेच पावसाळ्यात औंधसह परिसरातील अनेक गावांना मागील तीन महिन्यांपासून हुलकावणी दिली होती. मागील काही दिवस नुसताच सोसाटय़ाचा वारा सुरू होता; पण पाऊस काही पडत नव्हता. मात्र, आज झालेल्या धुवाँधार पावसाने कोरडय़ा पडलेल्या ओढय़ा-नाल्यांतून रस्त्यावरून पाणी खळाळून वाहिले. सकाळपासून हवेत मोठय़ा प्रमाणात उष्णता होती. दुपारी चारनंतर पावसाने सुरुवात केली. सुरुवातीला रिमझिम पडणाऱया पावसाने सायंकाळी पाचनंतर जोरदार सुरुवात केली. औंध परिसरातील गोसाव्याचीवाडी, जायगाव, वरूड, नांदोशी, खबालवाडी, खरशिंगे, येळीव, करांडेवाडी, गणेशवाडी व अन्य ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली.



























































