समुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी दुष्काळी भागात नेणार

66

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील 52 टक्के भूप्रदेश हा अवर्षणग्रस्त आहे. उर्वरित 48 टक्के प्रदेशात काही प्रमाणात पाऊस होतो. पण या पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात समुद्रात जाते. दुसरीकडे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ दरवर्षी अवर्षणाला तोंड देत असतो. त्यामुळे समुद्रात वाहून जाणारे पाणी रोखून ते विविध मार्गांनी या अवर्षणग्रस्त प्रदेशात कसे पोहचविता येईल यासाठी नदी जोड, वाटर ग्रीड अशा विविध उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

जपानचे भारतातील विशेष राजदूत केनजी हिरामत्सू यांनी सह्याद्री अतिथी गृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे यापुढचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नदी जोड आणि सिंचन विकास प्रकल्पात जपानच्या कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. ‘जपानने राज्यातील महत्त्वाकांक्षी अशा अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य दिले आहे. त्यामध्ये मेट्रो आणि स्मार्ट सिटीज प्रकल्पांचा समावेश आहे. या योजना प्रकल्पांतील जपानचे सहकार्य असेच कायम राहील, पण त्यापुढे जाऊन नदी जोड आणि सिंचन प्रकल्पातही जपानच्या कंपन्यांना गुंतवणुकीची संधी आहे. त्यासाठी त्यांनी पुढे यावे,’असे आवाहनही त्यांनी केले.

मोठय़ा गुंतवणुकीची गरज
या प्रकल्पामुळे अवर्षणग्रस्त भागाला दिलासा मिळेल. शाश्वत अशा सिंचन सुविधा निर्माण करता येतील. यासाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणुकीची आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज असेल. यासाठी जपानमधील कंपन्यांना आणि गुंतवणुकीला मोठी संधी आहे. त्यासाठी त्यांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.