राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांची हत्या! हल्लेखोरांनी घरात घुसून गोळय़ा घातल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानात जयपूर येथे  श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांची हत्या करण्यात आली आहे. तीन हल्लेखोरांनी घरात घुसून बेछूट गोळीबार केला. यात गोगामेडी यांचा मृत्यू झाला. या हत्याकांडामुळे राजस्थानात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांच्या गोळीबारात एक हल्लेखोर ठार झाला आहे.

राजस्थान विधानसभेच्या निवडणूका नुकत्याच संपल्या. त्यानंतर हे हत्याकांड झाले असून, जयपूर हादरले आहे. सुखदेवसिंह गोगामेडी हे मंगळवारी घरीच होते. दुपारी 1.45च्या सुमारास तीन हल्लेखोर मोटारसायकलवरून आले आणि गोगामेडी यांना भेटण्यासाठी आल्याचे सुरक्षा रक्षकाला सांगितले. सुरक्षा रक्षकाने गोगामेडी यांची भेट घडवून आणली. हल्लेखोर आणि गोगामेडी यांच्यात दहा मिनिटे बातचित झाली. त्यानंतर अचानक हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोगामेडी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्याबरोबर असलेले अजितसिंह गंभीर जखमी झाले.

पोलीस चकमकीत एक हल्लेखोर ठार

जयपूरचे पोलीस आयुक्त बी. जी. जॉर्ज जोसेफ म्हणाले, हल्लेखोरांची ओळख पटली असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत. पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये चकमक झाली. त्यात एक हल्लेखोर ठार झाला. नवीनसिंह शेखावत असे त्याचे नाव असून, जयपूरच्या शाहापुरा भागात त्याचे छोटे दुकान आहे. दोन हल्लेखोर एका व्यक्तीची स्कुटर घेऊन पळून गेले आहेत.

पद्मावत चित्रपटाला केला होता विरोध

सुखदेव सिंह गोगामेडी हे आधी श्री राजपूत करणी सेनेत होते. परंतु मतभेद झाल्यामुळे 2015 ला त्यांनी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना ही स्वतंत्र संघटना स्थापन केली. 2018ला ‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध केल्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते.