मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार – राजू शेट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दूध दरवाढिसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. बुधवारी रात्री जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलन आणि सरकारशी बोलणी सुरूच राहतील. मात्र जोपर्यंत सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असं शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारकडून आंदोलन दडपण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न चालू असल्याचा आरोप देखील केला.

‘दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ५ रुपये अनुदान द्या, दूधाला २५ – २७ रुपये भाव मिळायला पाहिजे, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. तसंच इतर राज्यातून महाराष्ट्रात येणारा दुधाचा लोंढा थांबवणे गरजेचे आहे. इतर राज्यात सरकार शेतकऱ्यांना अनुदान देते. त्यामुळे तेथील दुधाच्या किंमती कमी आहेत. इथल्या शेतकऱ्यांना देखील अनुदान मिळाले तर शेतकरी त्यांचा माल निर्यात देखील करू शकतील. राज्य सरकारच्या चुकिच्या धोरणामुळे सध्या शेतकरी संकटात आहे. सरकार जर उद्योजकांना निर्यातीत अनुदान देत असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांना देखील अनुदान द्यावे, असे शेट्टी यांनी सांगितले आहे.

त्याचप्रमाणे सरकारकडून आंदोलन दडपण्याचे काम सुरू असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मधुचंद्रासाठी गेलेल्या कार्यकर्त्यावरही गुन्हा दाखल केल्याची माहिती शेट्टी यांनी दिली आहे. महिलांशी अश्लील शब्दात संवाद साधने, आंदोलन शांतपणे चालू असतानाही कार्यकर्त्यांची धरपकड करणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार पोलिसांकडून सुरू असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

सरकार नुसतं आश्वासन देतं

सरकार आश्वासन देतं पण गुन्हे मागे घेत नाही. माझा स्वत:चा हा अनुभव आहे. मी सरकार आणलेला माणूस आहे. जर माझ्यावरचे गुन्हे मागे घेतलेले नाही, तर कार्यकर्त्यांवरचे गुन्हे कसे मागे घेतले जातील, असं शेट्टी यांनी सांगितलं. दरम्यान आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळतोय, राजकीय पक्ष, शेतकरी संघटनांनी पाठींबा दिला आहे. आंदोलन शांततेत सुरू असून कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.