नवाब मलिक व अनिल देशमुख यांच्या मतदान हक्कासाठी राष्ट्रवादी न्यायालयात जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱया निवडणुकीत मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न्यायालयात जाणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. आम्ही न्यायालयात जात आहोत. मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे त्यासंबंधाची परवानगी न्यायालयाकडे मागणार आहोत. त्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

ओबीसींना प्रतिनिधित्व हवे

ओबीसीच्या आरक्षणाच्या विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, सध्या ओबीसींचा प्रश्न आहे. त्यांना प्रतिनिधित्व मिळायला हवे. जातीनिहाय जनगणना ही चर्चा होते आहे. देशामध्ये नेमक्या किती जाती आहेत हे कळू द्या. म्हणजे जातींचा हा विषय थांबेल. राज्याची साडेबारा कोटी लोकसंख्या आहे. मात्र जातींबाबत जी ओरड लोक करतात त्यांच्या आकडेवारीनुसार बेरीज केली तर 40 कोटींच्या वर जाते, मात्र तेवढी संख्या नाही. त्यामुळे जातीनिहाय जनगणना झाली तर किती जाती आहेत हे स्पष्ट होईल, असेही अजित पवार म्हणाले.

बुलेट ट्रेनचा निर्णय मुख्यमंत्री घेतील

बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प पूर्णत्वास गेले पाहिजेत हे माझे वैयक्तिक मत आहे असे स्पष्ट करतानाच, मात्र अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असेही अजित पवार यांनी अन्य एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.