
राज्यसभेचे नवनिर्वाचित सभापती जगदीप धनखड यांच्या रागाचा पारा आज राज्यसभेत टिपेला पोहचला. त्याला निमित्त ठरले ते व्हॉईस रेकॉर्डिंग व कामकाजातून काही मुद्दे वगळण्याचा निर्णय. सभागृहात काही सदस्यांकडून व्हॉईस रेकॉर्डिंग होत असल्याच्या चर्चेबद्दल धनखड यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
लोकसभेच्या कामकाज पटलावरून राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे वगळण्यात आल्यामुळे विरोधी पक्षात संतापाची भावना असतानाच राज्यसभेतही विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे वगळण्यात आल्याने विरोधक चांगलेच भडकले. परिणामी, राज्यसभेतही वातावरण तापले. विरोधी पक्षाने सभापतींना टार्गेट करताच सभापती धनखड यांनी कडक शब्दांत तीव्र नाराजी बोलून दाखवली. देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे कामकाज उत्तम पद्धतीने चालावे यासाठी तुमच्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असताना भलतेच घडत आहे. हे बरोबर नाही. तुम्ही माझ्या चेंबरमध्ये या कुणाला चहा आवडत असेल तर त्याला चहा पाजेन, कोणाला कॉफी आवडत असेल तर कॉफी पाजेन, असे म्हणत धनखड यांनी सभागृहाचे वातावरण हलकेफुलके करण्याचा प्रयत्न केला.
सर्वात वेगवान अर्थसत्ता
हिंदुस्थानची अर्थव्यवस्था ही सर्वात वेगवान अर्थसत्ता असून आपला देश प्रगतिपथावर आहे, अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. आपली अर्थव्यवस्था उत्तम असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
























































