शेतकरी, कामगारांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू – राकेश टिकैत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाई किंवा कोणत्याही प्रकारचा हल्ला हा शेतकरी, कामगार, दलित, वंचित, उपेक्षित, मागासवर्ग, आदिवासी यांचा आवाज दाबू शकत नाही. आमची लढाई शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच राहील, असा हल्लाबोल भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी टि्वट करत केला आहे. टिकैत यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

शेतकरी नेते राकेश टिकैत कोडिहाल्ली चंद्रशेखर यांना बंगळुरूमध्ये एका स्टिंग ऑपरेशनमध्ये लाच घेताना दाखवले होते. या प्रकरणी खुलासा करण्यासाठी भारतीय किसान युनियनच्यावतीने बंगळुरूमध्ये सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात परिषदेत कामगार नेते राकेश टिकैत आणि युद्धवीर सिंह हे झाल्या प्रकाराबाबत पत्रकारांना माहिती देत होते. यावेळी हा शाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा काँग्रेस, आप आणि राष्ट्रीय लोक दल पक्षाने निषेध करून मोदी सरकारवर टीका केली आहे.

हल्लेखोरांनी पत्रकार असल्याचा केला बनाव
हल्लेखोरांनी पत्रकार असल्याचा बनाव करून पत्रकार परिषदेत प्रवेश मिळवला. पत्रकार परिषद सुरू असताना एकाने टिकैत बसले असलेल्या व्यासपीठाजवळ जाऊन माईकचा मायक्रोफोन नीट करण्याचा बहाणा केला आणि बेसावध असलेल्या टिकैत यांच्यावर माईकने हल्ला केला तर दुसऱ्याने शाईने टिकैत यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हा हल्ला भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून करण्यात आला, असा आरोप टिकैत यांनी केला आहे.