Video: तुमच्यासाठी मुलगी पळवून आणेन, भाजप आमदार राम कदम यांचं बेताल वक्तव्य

सामना ऑनलाईन । घाटकोपर

‘तुमचं कोणतंही काम असेल तर मला भेटा. एखाद्या मुलीला प्रपोझ केलं असेल आणि ती नाही म्हणत असेल तरी माझ्याकडं या. तुमच्यासाठी त्या मुलीला पळवूनही आणेन’, असं भयंकर आश्वासन भाजपचे प्रवक्ते, आमदार राम कदम यांनी केलं आहे. दहीहंडीच्या पवित्र उत्सवावेळी असं बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या वक्तव्यामुळे भाजपवर जोरदार टीका होत आहे.

मुंबईतील घाटकोपर मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी जमलेल्या तरुणांना खूश करण्यासाठी भयंकर आश्वासन दिलं. आपला फोन नंबरही सांगितला. हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला आहे.

या व्हिडीओमध्ये राम कदम म्हणाले…’साहेब मी तिला प्रपोझ केलं ती मला नाही म्हणते. प्लिझ मदत करा! 100 टक्के मदत करणार आधी तुमच्या आईवडिलांना घेऊन यायचं. तुमचे आईवडील म्हंटले साहेब आम्हाला ही पोरगी पसंत आहे… तर काय करणार… मी तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार… नंबर घ्या…’ असं म्हणत त्यांनी आपला फोन नंबरही तरुणांना दिला.

राम कदम यांच्या या वक्तव्याचा समाजातील सर्वच स्तरांतून निषेध करण्यात येत आहे. भाजप अशा आमदारांवर कारवाई करत नाही? असा सवाल नागरिक करत आहेत.

राम कदम यांनी आरोप फेटाळले

राम कदम यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. हा व्हिडीओ अर्धवट व्हायरल केला गेला आहे, असा खुलासा कदम यांनी केला आहे. ‘चुकीच्या अर्थानं मी ते वक्तव्य केलं नव्हतं. संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर माझ्या बोलण्याचा संदर्भ लागेल,’ असं त्यांनी म्हटलं आहे.