अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांनी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात येऊ नये, आयोजकांचे आवाहन

अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराच्या निर्माणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून 22 जानेवारी रोजी या मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी कोणाकोणाला आमंत्रणे धाडण्यात आली आहे, याबाबत उत्सुकता असून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना बोलावले जाणार अथवा नाही याबाबत उलटसुलट तर्क लावले जात होते. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी अडवाणी आणि जोशी यांनी या कार्यक्रमाला येऊ नये असे आवाहन करण्यात आल्याचे सांगितले आहे.

चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, अडवाणी आणि जोशी हे दोघेही वयोवृद्ध असून वयोमानामुळे त्यांना या कार्यक्रमाला हजर राहणे शक्य होणार नाही. त्यांचे वय लक्षात घेता त्यांना या कार्यक्रमाला हजर न राहण्याची विनंती करण्यात आली होती, जी त्यांनी मान्य केल्याचे राय यांनी सांगितले. राय यांनी म्हटले की, अडवाणी यांची या कार्यक्रमाला उपस्थिती प्रार्थनीय असेल मात्र त्यांचे वय पाहाता आम्ही त्यांना विनंती करत आहोत की त्यांनी या कार्यक्रमाला येऊ नये

मुरली मनोहर जोशींचा कार्यक्रमाला येण्याचा हट्ट

चंपत राय यांनी सांगितले की मुरली मनोहर जोशी यांना या कार्यक्रमाला हजर राहण्याची तीव्र इच्छा आहे. आपण त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता, मी त्यांना कार्यक्रमाला येऊ नका असे सांगत त्यांना विनंती केली. मात्र मुरली मनोहर जोशी यांनी आपल्याला या कार्यक्रमाला यायचे आहे असा हट्ट केल्याचे राय यांनी सांगितले. तुमचे वयोमान, थंडी आणि गुडघाबदल शस्त्रक्रियेमुळे मी त्यांना येऊ नका अशी वारंवार विनंती केली असे राय यांनी सांगितले.

22 जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. कायकाय तयारी सुरू आहे, कार्यक्रम कसा असेल याबाबत माहिती देण्यासाठी चंपत राय यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान सकाळी 11 वाजता येतील आणि प्रभू राम 1साडे अकरा वाजता प्राण प्रतिष्ठेसाठी येतील असे राय यांनी सांगितले.