पूर्णेकर हत्या प्रकरण – हेल्मेटधारी आरोपी राजेंद्र शिंदे, त्यांनीच मारेकऱ्याला बंदूक चालवायचे धडे दिले! राम पूर्णेकरचा पुराव्यांसह गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्ये प्रकरणी शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाच पूर्णेकर यांचा पुत्र राम याने आज दोन खळबळजनक व्हिडीओ समोर आणले. एका व्हिडीओत राजेंद्र शिंदे हे अटकेत असलेला हल्लेखोर निखिल यादवला बंदूक चालवण्याचे धडे देताना दिसत आहेत, तर दुसऱया व्हिडीओत एका पिस्तुलातून राजेंद्र शिंदे हे दोन वेळा हवेत फैरी झाडताना दिसत आहेत. दरम्यान, हल्ल्यातील पाचवा हेल्मेटधारी आरोपी राजेंद्र शिंदे हाच असल्याचा दावाही राम याने केला.

राम पूर्णेकर याने पत्रकार परिषद घेऊन राजेंद्र शिंदे यांच्याविरुद्ध आणखी पुरावे देत प्रश्नांची सरबत्ती केली. माझ्या वडिलांच्या हत्येला 22 दिवस उलटून गेले तरी पोलीस मीनाक्षी आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करत नाहीत. मी आणखी किती पुरावे द्यायचे, असा संतप्त सवाल राम याने केला. राजेंद्र शिंदे हे त्यांच्या मुळशी या गावी निखिल यादवला घेऊन गेले होते. तिथे त्यांनी त्याला बंदूक चालवण्याचे धडे दिले, असे सांगत राम याने व्हिडीओ दाखवला.

…म्हणून चौकशीला येताना टी-शर्ट घालतात

पाचवा आरोपी म्हणून पोलिसांनी ज्याला अटक केली तो अमित सिंग ऊर्फ पपलू याची शरीरयष्टी आणि व्हिडीओत दिसलेला बाईक चालवणारा हेल्मेटधारी यांच्या शरीरयष्टीत मोठी तफावत आहे, असे सांगत शर्टमध्ये असलेली हेल्मेटधारी व्यक्ती राजेंद्र शिंदे असल्याचा दावा राम याने केला. बिंग फुटू नये म्हणूनच राजेंद्र शिंदे शर्टऐवजी टी शर्ट घालून चौकशीला येतात याकडे राम याने लक्ष वेधले.

पुन्हा सहा तास चौकशी

राजेंद्र शिंदे यांची आज पाचव्यांदा चौकशी करण्यात आली. दुपारी 12 वाजता ते खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात आले. सायंकाळी 6 वाजता त्यांना सोडण्यात आले. दरम्यान, हत्येत वापरलेले पिस्तुल आणि दोन चॉपर कर्नाळा परिसरातून जप्त करण्यात आले आहेत.