
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील मिठी नदी प्रदुषणमुक्त व सुशोभिकरण करण्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुंबईतील मिठी नदी प्रदुषणमुक्त व सुशोभिकरण कामाच्या सद्यस्थिती संदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे सहसंचालक यशवंत सोनटक्के, पर्यावरण विभागाचे संचालक डॉ. बी. एम. पाटील उपस्थित होते.
कदम यांनी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, मलनि:सारण वाहिन्याचे काम, नालेसफाई, नदीतील गाळ काढणे,कचरा काढणे तसेच पुन्हा कचरा नदीमध्ये न जाण्यासाठी जाळया बसविणे,नदीचे सुशोभिरण आणि सुरक्षितता, नदी काठाने झाडे लावणे, नदी परिसरात नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी सुविधा निर्माण करणे, बसण्यासाठी खुर्च्याची सोय करणे, पुन्हा कचरा होणार नाही, परिसरात अतिक्रमणे होणार नाहीत, याची दक्षता घेणे, या कामांचा तसेच पुढे करावयाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी कदम म्हणाले, मिठी नदीला प्रदुषण मुक्त करून पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून हे काम लवकरात लवकर पुर्ण करावे. यामूळे नदी परिसराला पर्यटन स्थळांचे स्वरुप प्राप्त होईल. यावेळी चंद्रभागा, मुळा-मुठा, या प्रमुख नद्यांच्या प्रदुषमुक्त होण्यासाठी करावयाच्या कामाचाही आढावा पर्यावरण मंत्र्यांनी घेतला.





























































