संघर्षाची वेळ येताच पक्ष सोडणाऱ्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये जागा नाही!

ईडी, सीबीआयच्या भीतीने  आज काही लोक काँग्रेस पक्ष सोडून गेले. पक्षाने या लोकांना सर्व काही दिले, परंतु संघर्ष करण्याची वेळ आली तेव्हा पक्ष सोडून गेले. त्यांना याचा पश्चाताप होईल. पण अशा लोकांना काँग्रेस कधीही माफ करणार नाही आणि पुन्हा काँग्रेसमध्येही त्यांना जागा नाही, असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आज दिला.

मुंबई विभागीय काँग्रेसच्या वतीने एक दिवसाचे ‘रणशिंग’ हे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर मुलुंडमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबईचे माजी अध्यक्ष भाई जगताप, चरणसिंग सप्रा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रमेश चेन्निथला म्हणाले की, मोदी सरकारने दहा वर्षांत कोणतेही विकासाचे काम केले नाही; परंतु ‘मोदी गॅरंटी’ अशा जाहिरातींवर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. दोन कोटी नोकऱ्या, परदेशातील काळा पैसा आणून 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पेट्रोल-डिझेल 35 रुपये लिटरने देणार, या गॅरंटी मोदींनी 2014 साली दिल्या होत्या त्याचे काय झाले? आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मोदी गॅरंटी अशा जाहिराती देत आहेत. तिसऱ्यांदा निवडून येणार नाही याची नरेंद्र मोदींना खात्री आहे म्हणूनच ते सर्व पक्षातील आयाराम-गयाराम यांना जवळ करत असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

मुंबईतील गुंतवणूक दुसऱ्या राज्यात

काँग्रेस सरकार असतानाच मुंबईतील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व पर्यटनसारख्या क्षेत्रांची भरभराट झाली. मोबाईल असो वा हायस्पीड मेट्रो या योजना काँग्रेस सरकारने आणलेल्या आहेत. वांद्रे-कुर्ला कॉम्लेक्स, मंत्रालय, सरकारी कार्यालयांचा विस्तार हा काँग्रेसच्या काळातच झाला असल्याचे यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले. तर त्याचवेळी मुंबईतील अनेक प्रकल्पांची यादीच त्यांनी यावेळी वाचून दाखविली. तर मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न केले जात असून मुंबईतून कोटय़वधींची गुंतवणूक दुसऱ्या राज्यात पळवली जात असल्याचा आरोप खरगे यांनी यावेळी केला.