रणजी क्रिकेट स्पर्धा, एलिट अ गट नागपूरमध्ये गतविजेत्या विदर्भाला भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर 

सर्वाधिक वेळा रणजी चॅम्पियन ठरलेल्या मुंबई क्रिकेट संघासमोर उद्यापासून जामठा येथे सुरू होणार्‍या रणजी क्रिकेट स्पर्धेतील एलिट अ गटातील लढतीत गतविजेत्या विदर्भाचे आव्हान असणार आहे. यावेळी सहा सामन्यांमधून फक्त 11 गुणांची कमाई केलेल्या मुंबईला निर्णायक विजयाची गरज असून ही लढत ड्रॉ झाल्यास साखळी फेरीतच गारद होण्याची नामुष्की मुंबईवर ओढवू शकते. विदर्भाने सहा सामन्यांमधून 21 गुणांची कमाई करीत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे सिद्धेश लाडच्या मुंबईसाठी उद्यापासून सुरू होणारी लढत ही ‘करो या मरो’ अशीच असणार आहे.

मुंबईचा संघ अ व ब गटातून मिळून 11 गुणांसह 14व्या स्थानावर आहे. विजय हजारे ट्रॉफी जिंकणार्‍या मुंबईला यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये एकाही लढतीत विजय मिळवता आलेला नाही. ही खेदजनक बाब. पण शार्दूल ठाकूर व तुषार देशपांडे या गोलंदाजांच्या आगमनानंतर मुंबईच्या गोलंदाजीतील धार वाढलीय. फैझ फझल व वासीम जाफर हे विदर्भाचे फलंदाज फॉर्ममध्ये असून मुंबईच्या गोलंदाजांना त्यांना रोखावेच लागणार आहे.  

फलंदाजांवर मदार

सिद्धेश लाड याने याही मोसमात आपली चमक दाखवलीय. बडोदे व सौराष्ट्र या संघाविरूद्ध त्याने दमदार शतक झळकावले आहे. श्रेयस अय्यरनेही जेव्हा संघाचे प्रतिनिधित्व करायला संधी मिळालीय तेव्हा शानदार खेळ केलाय. या दोघांसोबत आता विक्रांत औटी, जय बिस्ता, आदित्य तरे यांनीही आपली जबाबदारी ओळखून खेळ करायला हवा. मुंबईची मदार फलंदाजांवर असेल.