
चाहत्यांना दाखवलेला अॅटिट्यूड, पत्रकारांना दिलेली उद्धट वागणूक यावरून ट्रोल झालेली रानू मंडल पुन्हा एकदा नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. रानूला एका कार्यक्रमात गाणं म्हणायला सांगितलं. मात्र तिने नुकतंच हिमेश रेशमिया सोबत रेकॉर्ड केलेलं गाणं देखील ती विसरून गेली आहे. तिच्या त्या विसरभोळेपणाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असून त्यात रानू मोडक्या तोडक्या इंग्रजीत गाणं विसरल्याचे सांगताना दिसत आहे. तिच्या या विसरभोळेपणावरून व मोडक्या इंग्रजीवरून नेटकऱ्यांनी तिची फिरकी घेतली आहे.
रानूने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी सूत्रसंचालन करणाऱ्या बरखा दत्त यांनी रानूला गाणे गाण्याची विनंती केली. त्यावेळी रानूने स्वत: हिमेश रेशमियांसोबत गायलेले गाणे गाते असे सांगितले. मात्र गाण्यातील एक अक्षर देखील रानूला आठवत नव्हतं. त्यानंतर रानूने ‘Oh shit i forgot it’ असे इंग्रजीतून म्हटले. या कार्यक्रमातील तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काही दिवसांपू्र्वी एका चाहतीने अंगाला हात लावल्याने रानू भडकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर रानू मीडियावाल्यांना अॅटीट्यूड दाखवत असल्याचा व्हिडीओही चांगलाच गाजला होता. त्यावरून तिला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर अति प्रमाणात केलेल्या मेकअपमुळे देखील रानू ट्रोल झाली होती.





























































