
सामना प्रतिनिधी । मालवण
कुंभारमाठ येथील एका घटस्फोटीत महिलेला खोटे नाव सांगून तिच्याशी लग्न करणाऱ्या पुणे हडपसर येथील एका ठकसेना विरोधात बलात्कार व फसवणूक प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने माहिती दिल्यानुसार संपत दरवडे ऊर्फ मनोज चांगदेव पाटील, वय ३४ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार- कुंभारमाठ येथील एका विवाहितेचा सहा वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती कुंभारमाठ येथे आई, वडीलांकडे वास्तव्यास होती. ऑगस्ट २०१६ मध्ये एका विवाहाच्या संकेतस्थळावरील तिच्या प्रोफाईलवर मनोज पाटील याने रिक्वेस्ट पाठविली होती. त्यानंतर त्याने तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. सप्टेंबर १६ मध्ये लग्नाची बोलणी झाली. त्यानंतरच्या कालावधीत गाडी तसेच अन्य साहित्य घेण्यासाठी मनोज याने तिच्याकडून पैसे घेतले.
१८ मे २०१७ रोजी हडी येथे त्या महिलेचे मनोज याच्याशी वैदीक पद्धतीने लग्न झाले. लग्नानंतरही मनोज याने तिच्याकडून टप्प्याटप्प्याने पैसे उकळले. लग्न झाल्यानंतर मनोजने तिला सासरी नेले नाही. मधल्या काळात पुणे येथे एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास नेले. मात्र तो तिथे केवळ पंधरा दिवसच वास्तव्यास असायचा. याबाबतची विचारणा केल्यानंतर त्याने सातत्याने खोटी माहिती दिली. त्यानंतर मनोज याचे मोबाईलसुद्धा बंद झाला. त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्नही न केल्याने अखेर ती पुन्हा माहेरी आली.
पीडित महिलेने मालवण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बलात्कार, फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रेश्मा मोमीन या तपास करत आहेत.




























































