
सामना प्रतिनिधी, खेड
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खेड तालुक्यातील रसाळगड किल्ल्यावरील कोठाराची भिंत ढासळली आहे. या गडावर गेल्या दहा वर्षांत कोट्यवधी रुपये डागडुजीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आले. मात्र, गडाची अवस्था दयनीय झाली असल्याने भ्रष्टाचार करणाऱ्यांनी महाराष्ट्राचे वैभव असलेले गडकिल्ले तरी सोडा अशी टिकत प्रतिक्रिया गडप्रेमींकडून उमटू लागल्या आहेत.
खेडचा रसाळगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानातील एक सुवर्ण पान आहे. या गडावर असलेले इतिहासकालीन अवशेष शिवरायांचे वास्तव्य या गडावर असे याचे साक्ष देतात. गडावरच्या पठारावर झोलाई मातेचे मंदिर त्याच्या बाजूला असलेले थंड पाण्याचे तळे, धान्य कोठार, राजमहल, त्याचप्रमाणे गडाच्या पूर्व दिशेच्या कातळात कोरलेले पाण्यातील गणेश मंदिर ही गडाची खास वैशिष्ट्ये आहेत.
गेली काही वर्ष छत्रपती शिवरायांचा हा गड दुर्लक्षित होता मात्र 1990 साली खेड मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार रामदास कदम निवडून आले आणि गडाच्या डागडुजीला सुरवात झाली. पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करून गडाच्या डागडुजीसाठी आवश्यक तो निधी मंजूर करून घेण्यात आला आणि सर्वप्रथम गडावर वीज नेण्यात आली. त्यानंतर झोलाई मंदिर, धान्य कोठार, राजवाडा, मंदिरासमोरील दीपमाळ यांची डागडुजी करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने गडाच्या पायऱ्यांचा डागडुजीपासून झालेले सारेच काम सुमार दर्जाचे झाले. खेड येथील रत्नगिरी गडकोट समितीने या भ्रष्ट्राचाराचा पर्दाफार्श केल्यावर रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी गायकवाड यांनी रसाळगडला भेट दिली. झालेल्या डागडुजीचे कामाची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले अनेक भुईकोट, गडकोट व जलदुर्ग उभे आहेत. मात्र, या किल्ल्यांना सरकारी दुर्लक्षचे ग्रहण लागले आहे. रसाळगड किल्ला शासनाने दहा वर्षांपूर्वी पर्यटन विकास व संवर्धन करण्याच्या उद्देशाने निवडला होता. या किल्ल्यावर त्या कालावधीत कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आले. गडाच्या पायथ्यापर्यंत रस्ता पोहोचवण्यात आला आहे. दोन दशकांपूर्वी दुर्गम असलेला हा किल्ला आता पर्यटकांच्या व इतिहासप्रेमींना पाहण्यासाठी सुलभ झाला आहे. या गडापर्यंत आता चारचाकी वाहने देखील पोहचू शकतात. परंतु गेल्या दहा वर्षांत या गडाची स्थिती पुन्हा चिंताजनक बनू लागली आहे.
रसाळगड किल्ल्यावर असलेले दरवाजे, पायऱ्या , कोठार, तोफा, इमारती, समाधी स्थळ, बुरुज, मंदिर परिसर यांच्यावर शासनातर्फे करण्यात आलेला खर्च वाया गेला आहे. मंदिराचं सुशोभीकरण, बुरुजांचे मजबुतीकरण, तोफांचे संरक्षण, कोठाराची डागडुजी इत्यादी कामे अर्धवट अवस्थेत आहेत. गडावरील समाधी दुर्लक्षित आहेत. सरकारच्या संबंधित यंत्रणेतील अधिकारी यांनी गेल्या दहा वर्षात गडाकडे पाठ फिरवल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
पावसाळ्यात रसाळगड किल्ल्यावर शासकीय यंत्रणेने विशेष लक्ष देण्याची गरज आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असते. गेल्या काही दिवसांत या ठिकाणी कोसळलेल्या मुसळधार पावसात गडावरील कोठाराची एक भिंत कोसळली आहे. इतिहासाची साक्ष देणार्या वस्तू ढासळू लागल्यास भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासासोबत जोडणाऱ्या या वस्तू नष्ट होण्याची भीती इतिहास प्रेमींतून व्यक्त होत आहे. शासनाने तात्काळ लक्ष देऊन येथे उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्याबरोबरच भ्रष्टाचार करणाऱ्यांनी महाराष्ट्राचे वैभव असलेले गडकिल्ले तरी सोडावेत, अशी टिकत प्रतिक्रिया गडप्रेमींकडून उमटू लागल्या आहेत.



























































