
‘रसना’ (Rasna) या नामांकित कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष अरीज पिरोजशॉ खंबाटा (Areez Pirojshaw Khambatta) यांचे निधन झाले आहे. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते 85 वर्षांचे होते. कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
अरीज खंबाटा यांनी केलेल्या मेहनत आणि प्रयत्नांमुळे, देशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हजारो नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. फळांवर आधारित उत्पादने विकसित केल्यामुळे लाखो शेतकर्यांना त्याचा फायदा झाला. देशभरातील शेतकऱ्यांना एक बाजारपेठ उपलब्ध झाली, शिवाय शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळाला, असे कंपनीने म्हटले.
अरीज खंबाटा यांनी उद्योग, व्यवसाय आणि समाजसेवेच्या माध्यमातून सामाजिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. ते अहमदाबाद पारशी पंचायतीचे माजी अध्यक्ष होते. त्याशिवाय पारशी-इराणी झोराष्ट्रीयन समुदायाची संघटना असलेल्या WAPIZ या संघटनेचेही अध्यक्ष होते. खंबाटा हे ‘रसना’ या लोकप्रिय घरगुती शीतपेयासाठी ओळखले जातात. सध्या देशात 18 लाख किरकोळ दुकानांवर रसनाची विक्री होते. ‘रसना’ कंपनीकडून विविध उत्पादने तयार केली जात असून देशात आणि परदेशात त्याला चांगली मागणी आहे.
दरम्यान, ‘रसना’ या शीतपेयाने गेल्या अनेक दशकांपासून हिंदुस्थानी बाजारपेठेवर राज्य गाजवले आहे. उन्हाळ्यात प्रत्येकाच्या घरात दिसणाऱ्या या शीतपेयाने पाहुण्याचीही तहान भागवली आहे. देशात आणि विदेशातली या शीतपेयाची मागणी आहे. खंबाटा यांनी 1970 दशकात महागड्या शीतपेयांना पर्याय म्हणून ‘रसना’ या प्रोडक्टची सुरुवात केली. ‘स्वस्तात मस्त’ शीतपेय म्हणून ‘रसना’ हा ब्रँड अल्पावधीतच देशभरात लोकप्रिय झाला.
























































